Virar Shocker: विरार मध्ये 5व्या मजल्यावरून नवजात चिमुकलीला फेकलं; अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
Representational Image | (Photo Credits: IANS)

विरार मध्ये उंच इमारतीवरून एका नवजात बालकाला फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, विरार पश्चिमेला असलेल्या यशवंत नगर येथील ट्युलिप स्टार सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. या इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या टेरेसवरून अवघ्या तासाभरापूर्वी या जगात आलेल्या तान्ह्या मुलीला फेकल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारची आहे. विरार पोलिसांकडून या चिमुकलीची आई असणार्‍या महिलेला ताब्यात घेतलं आहे.

बाळाला पाहून स्थानिकांनी तातडीने तिला ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. हिंदुस्तान टाईम्स सोबत बोलताना इंस्पेक्टर प्रफुल वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ही घटना मंगळवार, 2 ऑगस्टची सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे. चिमुकली रस्त्यावर आढळली असून तिच्या डोक्याला आणि खांद्याला जबर जखमा झाल्या होत्या. ती बहुधा टेरेस वरून फेकली गेली असावी.'

वाघ यांनी दिलेल्या माहितीमध्ये असे देखील सांगितले आहे की जी महिला तिची आई असल्याचं सांगत आहे तिला सध्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे तसेच तिच्याविरूद्ध मर्डरची देखील केस रजिस्टर करण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणामध्ये अटक झालेली नाही. बाळाच्या पोस्ट मार्टमचा रिपोर्ट देखील येणं अद्याप बाकी आहे.

पोलिसांकडून बिल्डिंगच्या सीसीटीव्ही फूटेजचा तपास सुरू आहे. तर पोलिसांच्या ताब्यात असलेली बाळाची आई अवघी 16 वर्षांची आहे. तिचा 25 वर्षीय बॉयफ्रेंड आहे. पोलिसांकडे जबाब नोंदवताना तिने तिची प्रेंगंसी कुटुंबियांपासून लपवल्याचा दावा केला आहे. सध्या तिच्या बॉयफ्रेंडची देखील पोलिस चौकशी सुरू आहे.