विरारच्या अर्नाळा गावामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून चक्क 28 जणांवर हल्ला केला आहे.यात जखमी झालेल्या नागरिकांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लहानापासून मोठ्यांवर ही या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. अर्नाळा गावातील विपुल निजाई या 27 वर्षाच्या तरुणासोबतच गावातील 10 वर्षाचा निनाद डवळेकर, 40 वर्षाचा केवल वैद्य आणि 67 वर्षाच्या शंकुतला मोरे यांच्याबरोबर एकूण 28 जणांवर या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आहे. (हेही वाचा - Dog Attack In Amroha: हृदयद्रावक! भटक्या कुत्र्यांचा 108 वर्षीय महिलेवर हल्ला; उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह)
दरम्यान ज्या कुत्र्याने चावा घेतला आहे तो कुत्रा अजूनही सापडला नसल्याने, गावातच आहे. त्यामुळे त्या पिसाळेल्या कुत्र्याला जर रेबिज असेल तर त्याने ज्या कुत्र्यांचा चावा घेतलाय त्यांना ही रेबिज होऊन ते ही पिसाळतील अशी भिती गावकऱ्यांना आहे.
अर्नाळ्यात कित्येकवेळा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तरीही प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. अर्नाळा समुद्र किनारी शहरातील अनेक भटकी कुत्रे आणून सोडली जात असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. या समुद्र किनारी जवळपास दीड हजार भटकी कुत्री आहेत. या कुत्र्यांच्या दहशतीने लहान मुलं एकट्याने बाहेर खेळायला पडत नाहीत असे देखील गावकऱ्यांनी सांगितले आहे.