विरार: दीड लाखाचे बिल ऐकून एका कोरोनाबाधित रुग्णाचे रुग्णालयातून पलायन
Coronavirus (Photo Credits- IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोनामुळे संपूर्ण राज्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. दरम्यान, खाजगी रुग्णालयाकडून कोरोनावरील उपचारासाठी रुग्णांकडून अधिक पैसे उकळले जात असल्याचे अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यातच दीड लाखाचे बिल ऐकून एका कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयातून पळ काढल्याचे घटना उघडकीस आली आहे. संबंधित रुग्ण गेल्या काही दिवसांपासून विरार (Virar) पश्चिमेकडील विजय वल्लभ रुग्णालयात (Vijay Vallabh Hospital) उपचार घेत होता. मात्र, रुग्णाची तब्येत सुधारल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात येणार होते. यावेळी आपल्या 5-6 दिवसांच्या उपचाराचे बिल तब्बल दीड लाखाच्या घरात आल्याचे समजताच, रुग्णाने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याच्या बहाण्याने रुग्णालयातूनच पळ काढला आहे. न्युज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनावरील उपचार घेण्यासाठी संबंधित रुग्ण 12 जुलै रोजी विरार पश्चिम भागातील विजय वल्लभ रुग्णालयात दाखल झाला होता. दरम्यान, 5-6 दिवस उपचार घेतल्यानंतर रुग्णाच्या तब्येत सुधारणा झाल्यामुळे त्याला रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. परंतु, आपल्याला तब्बल दीड लाखाचे बिल आल्याचे समजातच रुग्णाने रुग्णालयातून पळ काढला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाला फोन केल्यानंतर मी सर्वांना बाधित करेन, अशी धमकीही त्याने दिली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या रुग्णाचा शोध सुरु आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून 27 जुलै रोजी धारावी येथे 'प्लाझ्मा डोनेशन कॅम्प'चे आयोजन

कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या व शासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या होत्या. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करावा अशा सूचनाही दिल्या होत्या. दरम्यान, रुग्णांकडून अधिक पैसे आकरत असलेल्या खाजगी रुग्णालयांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे.