कोविड-19 (Covid-19) संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 27 जुलै रोजी मुंबईतील (Mumbai) धारावी (Dharavi) येथे प्लाझ्मा डोनेशन कॅम्पचे (Plasma Donation Camp) आयोजन केले आहे. 'प्लाझ्मा दान संकल्प अभियान' (Plasma Daan Sankalp Abhiyan) असे या प्रोग्रॅमचे नाव असून धारावीतील कोरोनामुक्त झालेल्यांकडून या अभियानाअंतर्गत प्लाझ्माचे दान करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या काळात धारावी हे कोरोनाचे हॉटस्पॉट होते. परंतु, सरकारच्या प्रयत्नांमुळे येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. धारावीतील कोविड-19 नियंत्रणाची दखल खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने देखील घेतली आहे.
धारावीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून खास योजना राबण्यात आल्या होत्या. तसंच येथील कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांकडून प्लाझ्मा दान करण्यात यावे यासाठी या अभियानाची योजना करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार राहुल शेवाळे यांनी प्लाझ्मा डोनेशन कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचे प्राथमिक स्क्रिनिंग कामराज मेमोरियल स्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी म्हणजेच 27 जुलै रोजी होणार आहे. (Coronavirus Update: मुंबई, ठाणे, पुणे सह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी पहा)
कोरोनामुक्त झालेल्या 500 नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि त्यापैकी 50 जणांचे प्रायमरी स्क्रिनिंग झाले आहे, असे शेवाळे यांनी सांगितले आहे. तसंच धारावीतील लोकांनी कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात चांगले यश मिळवले आहे. आता ते संपूर्ण महाराष्ट्राला मदत करण्यासाठी सज्ज झाले आहेत, असेही शेवाळे म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत (24 जुलै) धारावीत सध्या 2519 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 2141 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 128 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.