कोरोना संसर्गापासून स्वतःला आणि दुसऱ्याही सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क (Mask) घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संकट काळात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मात्र हा नियम अनेकजण गंभीरपणे पाळत नसल्याचे समोर आले आहे. पुण्यामध्ये (Pune) 2-10 सप्टेंबर दरम्यान मास्क घालण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 27,989 घटनांची नोंद झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्क घालण्याचा नियम पाळावा, हा या नियमामागील उद्देश असल्याचे पुणे शहराचे गुन्हे शाखेचे डिसीपी बी. सिंग (B Singh, DCP Crime, Pune City) यांनी सांगितले आहे. तसंच या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि पोलिस काम करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचविण्यात तसेच उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच कोरोनाच्या रुग्णांना वेळेत योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. (Coronavirus Cases In Maharashtra: राज्यात कोरोना विषाणू ज्वालामुखी उद्रेक, महाराष्ट्राने पार केला 10 लाख रुग्णांचा टप्पा, चिंता वाढली!)
ANI Tweet:
#Maharashtra: 27,989 cases of violating mask-wearing norms registered in Pune from Sep 2- 10.
"The only aim of this rule is to encourage people to wear masks in public places. The enforcement has been carried out by the PMC & the Pune Police," says B Singh, DCP Crime, Pune City. pic.twitter.com/VckAG72XPq
— ANI (@ANI) September 11, 2020
देशातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दिवसागणित महाराष्ट्रातून कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्राने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. पुण्यातही कोरोना बाधितांचा आकडाही वाढताना दिसत आहे. पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2,18,502 वर पोहचला आहे. त्यापैकी 1,44,412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 69,456 सक्रीय रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान पुण्यातील मृतांचा आकडा 4,634 इतका आहे.