शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे पार्थीव आज बीड शहरात आणले आहे. आज (15 ऑगस्ट) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Vinayak Mete Funeral) केले जातील. काल (14 ऑगस्ट) त्यांचे अपघाती निधन झाले. बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर विनायक मेटे यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असलेल्या शेतापर्यंत मेटे यांची अंत्ययात्रा काढली जाईल. मेटे यांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shind) हे देखील उपस्थित राहणार आहेत.
शिवसंग्रामचे मुंबईचे अध्यक्ष राजन घाग यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांच्या शेतात प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी विमानाने औरंगाबादला रवाना होतील. दुपारी एकच्या सुमारास ते मुंबईहून औरंगाबादला पोहोचतील. त्यानंतर ते दुपारी 3.40 च्या दरम्यान ते मेटे यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील असे समजते. (हेही वाचा, Vinayak Mete Last Rites: विनायक मेटे यांच्यावर 15 ऑगस्टला बीड मध्ये होणार अंत्यसंस्कार)
विनायक मेटे हे शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख होते. पाठिमागील अनेक वर्षे ते राज्याच्या राजकारण समाजकारणात सक्रीय होते. मराठा समाज आरक्षणासाठी ते नेहमी आक्रमक आणि आग्रही राहिले. ते विधानपरिषदेत सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते. आमदारही होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) 14 ऑगस्टच्या पहाटे त्यांचा अपघात झाला. अपघाततच त्यांचे निधन झाले. धक्कादायकरित्या झालेल्या निधनामुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले तेव्हा मेंदूला मार लागल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.