
मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता परत एकदा शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा शिवस्मारकाचे भूमिपूजन केले आहे. आश्चर्य म्हणजे हे भूमिपूजन अंधाऱ्या रात्री, गुपचूप. कोणालाही कळू न देता करण्यात आले आहे. मात्र अजून एकदा विनायक मेटे यांनी हे भूमिपूजन का केले, याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान या कृत्यामुळे विनायक मेटे यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.
नरेंद्र मोदींच्या नंतर, दोन महिन्यांपूर्वी मेटे यांनी जलपूजन आयोजित केले होते. त्या वेळी स्मारकाच्या ठिकाणी जाताना एक बोट उलटून झालेल्या अपघातात एका युवकाचा हकनाक बळी गेला होता. त्यानंतर आज परत एकदा अंधाऱ्या रात्री या स्मारकाचे पूजन करण्यात आले आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन गुपचूप करण्याची नामुष्की या सरकारवर ओढवली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली आहे. निधड्या छातीचे, लढवय्ये अशी ख्याती असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन महाराजांच्या इतमामाला साजेसं करण्यात या सरकारला कमीपणा वाटला का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.