Vijay Wadettiwar | (Photo Credit: twitter)

Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची काही दिवसांपूर्वी निघृण हत्या (Murder) करण्यात आली. या हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली असून या प्रकरणातील काही आरोपींना अद्याप अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन मुंडे अद्याप फरार आहे. या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) वर खंडणीचा आरोप करण्यात येत आहे. तथापी, वाल्मिक कराड सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण आला. त्यानंतर कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे.

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर -

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो. त्यामुळे छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर करू नका. मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर केला तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असे होऊ शकते, अशी माहिती मला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे, असा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (हेही वाचा -Walmik Karad Police Surrender: वाल्मिक कराड पुणे CID पोलिसांना शरण, Santosh Deshmukh Murder प्रकरणात मोठी अपडेट)

वाल्मिक कराडसाठी पोलीस ठाण्यात बेड?

वडेट्टीवार यांनी याविषयी अधिक स्पष्टीकरण देण्याचे टाळले. गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी बीड प्रशासनावरही टीका केली. तसेच वाल्मिक कराडसाठी पोलीस ठाण्यात बेड नेले जात आहेत का? असा सवाल केला. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वाल्मिक कराडला पोलिस पकडू शकले नाहीत. अखेर तो स्वत:हून शरण आला. या प्रकरणामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. त्यांनी याकडे लक्ष न दिल्यास पोलीस विभागाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. (हेही वाचा -Santosh Deshmukh Murder Case: अभिनेत्री Prajakta Mali च्या तक्रारीनंतर अभिनेत्रीबद्दल अनुचित टिप्पणी करणाऱ्या सुरेश धसने मागितली माफी)

वाल्मिक कराडवर खंडणीचा आरोप -

दरम्यान, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी खंडणीच्या गुन्ह्यात हवा असलेला कराड मंगळवारी पुण्यात पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याला बीड जिल्ह्यातील केज येथील न्यायालयात हजर केले असता, त्याच दिवशी त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरपंच देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.