Vijay Wadettiwar (Photo Credits: Twitter/Maha DGIPR)

महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांत यंदा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे त्रस्त झाला आहे. यामध्ये सरकारने आपल्याला काहीतरी मदत करावी यासाठी याकडे बळीराजा वाट लावून बसला आहे. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांनी शेतपिकांचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्याचा सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावे असे आदेश विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात काही दिवसांपूर्वी परभणी, सांगली, उस्मानाबाद, सातारा, अकोला, भंडारा आदि जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पोखर्णी, दैठणा परसरात वादळ वारा आणि विजा चमकल्या. सांगली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. द्राक्ष पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला. हेदेखील वाचा- Rain in Maharashtra: विजांचा कडकडाट, वादळ वारा, त्यात जलधारा; महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका

अवकाळी पावसामुळे सांगली परिसरात द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. दुसऱ्या बाजूला ज्वारी, हरबरा आदी पिकांनाही याचा मोठा फटका बसला. यामुळे हे नुकसान कसे भरून काढायचे या विचारात बळीराजा आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने अहवाल सादर करावा असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.