मुलगा झाला नाही म्हणून कुटुंबीय माझा छळ करायचे; विद्या चव्हाण यांच्या सुनेचा धक्कादायक खुलासा
विद्या चव्हाण (PC - Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा आरोप केला आहे. परंतु, विद्या चव्हाण यांच्या सुनेने हे आरोप खोडून काढत धक्कादायक खुलासा केला आहे. आपले विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप खोटा असून चव्हाण कुटुंबीयांनी माझ्याविरोधात पुरावे गोळा करुन मला बदनाम करण्याची धमकी दिली होती, असे म्हटले आहे. तसेच 'मला मुलगा झाला नाही म्हणून सर्व कुटुंबीय माझा छळ करायचे,' असा खुलासा विद्या चव्हाण यांच्या सुनेने केला आहे. ज्या व्यक्ती महिलांच्या प्रश्नासाठी लढतात त्यांनीच माझ्यावर अन्याय केला आहे, असं विद्या चव्हाण यांच्या सुनेने म्हटलं आहे.

विद्या चव्हाण यांच्या सुनेला एक मुलगी असून मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टासाठी छळ होत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी विद्या चव्हाण (सासू), अभिजीत चव्हाण (सासरे), अजित चव्हाण (पीडितेचा नवरा), आनंद चव्हाण (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - मध्य प्रदेशातील 'ऑपरेशन लोटस'च्या अयशस्वी प्रयत्नानंतर अशोक चव्हाण यांचा BJP ला खोचक टोमणा, पहा काय म्हणाले)

दरम्यान, विद्या चव्हाण यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. सुनेच्या मोबाइलमधील चॅट आणि इतर काही गोष्टींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं. त्यामुळे आम्ही यासंदर्भात पुरावे गोळा करत घटस्फोटासाठी वकिलांशी संपर्क साधला', असं स्पष्टीकरण विद्या चव्हाण यांनी दिलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपा महाराष्ट्र या ट्विट अकाऊंटवरून विद्या चव्हाण यांच्या पक्षातील त्यांच्या सहकारी महिला नेत्यांना प्रश्न विचारला आहे. 'खासदार सुप्रिया सुळे ताई आणि महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर ताई, सुनेचा छळ करणाऱ्या तुमच्या सहकारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही?,' असा प्रश्न या ट्विटमध्ये राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांना भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.