पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati) हा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणपतीची खास मूर्ती प्रत्येक भक्ताला आकृष्ट करत असते. आता माहिती मिळत आहे की, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टसाठी गणेश मूर्ती रंगविणारे ज्येष्ठ रंगकार श्रीधर अंबादास ऊर्फ अण्णा मुकेरकर (Sridhar Mukerkar) यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गेली 60 वर्षे ते ही मूर्ती रंगवण्याचे काम करत होते. त्यांच्यामागे मुलगा, चार मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.
गणेश पेठेमधील ढोर गल्लीमध्ये मुकेरकर यांचे घर आहे. श्रीधर मुकेरकर ही आधी चित्रकलेचे शिक्षक होते. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी मूर्ती रंगवायचे काम सुरु केले. 1967 साली दगडूशेट मंदिराजवळ त्यांनी आपले पेंटिंगचे दुकान थाटले होते. तिथूनच गणेश मुर्त्या रंगवण्याचे काम सुरु झाले. दगडूशेट व्यतिरिक्त ते गरुड गणपती, राजाराम मंडळ अशा अनेक प्रसिद्ध मंडळांचे गणपती रंगवायचे. आता त्यांचा मुलगा राजेंद्र आणि नातू अनुपम हे गणेश मूर्ती रंगविण्याचा त्यांचा वारसा पुढे चालवीत आहेत.