मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आज पुण्यात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. कात्रजच्या डेअरी संदर्भातल्या विषयासाठी ही भेट घेतल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे. पण आता काही दिवसांवर लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर होण्याचं चिन्ह असताना लोकसभेसाठी उत्सुक असलेले वसंत मोरे काही मतांची जुळवाजूळव करत आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.
वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया देताना 'माझ्या प्रभागातील मैदानाचा प्रश्न प्रलंबित आहे, जो सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात येतो. या प्रश्नासाठी भेट घेतली. सुप्रिया सुळेंनी 'निसर्ग' मध्ये भेटायला येण्यास सांगितलं. तेथे पोहचल्यावर शरद पवार देखील उपस्थित असल्याचं समजलं त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे यांची एकत्र भेट झाल्याचं ते सांगतात. दरम्यान मोरे पुण्यातून लोकसभेसाठी उत्सुक आहेत. पण मनसे महायुतीत जाण्याच्या चर्चा असताना आणि पुण्यातून अन्य काहींची देखील नावं चर्चेमध्ये असल्याने वसंत मोरे नाराज असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान मनसेच्या बाजूने आपण असणार आहोत. पुण्यासाठी इच्छूक असलो तरीही अमित ठाकरे पुण्यातून लढणार असल्यास आपण त्यांच्यासाठी जागा सोडू असेही म्हटलं आहे. राजकारणात कुणीच दुश्मन नसतो, कात्रज डेअरी मैदानाच्या प्रश्नासाठी मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायला लागलं तरी देखील मी जाईन असं वसंत मोरे म्हणाले आहेत. आज कात्रज डेअरी साठी खासदार सुप्रिया सुळेंना भेटल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर मनसे नेते महायुतीच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यामुळे महायुतीमध्ये मनसे एंट्री करणार का? अशी चर्चा रंगत आहे. मात्र राज ठाकरेंनी अशा व्यासपीठावर एकत्र आल्याने युत्या, आघाड्या होत नसतात म्हणत अद्याप त्यांच्या भूमिकेवर बोलणं टाळलं आहे. निवडणूका आल्या की बघू असं म्हणत त्यांनी काही दिवसांपूर्वी या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.