COVID-19 च्या पार्श्वभूमीवर वसई, विरार आणि पालघरमध्ये पेट्रोल-डिझेल बंद, फक्त अत्यावश्यक वाहनांनाच मिळणार ही सुविधा
पेट्रोल डिझेलची तस्करी (Photo Credits: Getty)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यात नागरिक लॉकडाऊनच्या काळातही आपल्या गाड्या सर्रासपणे प्रवास करताना दिसत आहे. त्यामुळे अशा लोकांना आता आवर घालण्यासाठी वसई, विरार आणि पालघरमध्ये पेट्रोल- डिझेल (Petrol-Diesel) सेवा बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक वाहनांनाच ही सेवा मिळणार असल्याचे सांगत पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी 8 मार्च रोजी याबाबतचा आदेश काढला आहे. Tv9 मराठी ने दिलेल्या वृत्तानुसार, येथे अत्यावश्यक सेवा असलेल्या वाहनांशिवाय खाजगी वाहनांना पेट्रोल-डिझेल ही सेवा मिळणार नाही.

लॉकडाऊन असताना देखील लोक अनेक जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी मोठमोठ्या वाहनांच्या रांगा लागत आहे. तसेच काही लोक आपली खाजगी वाहने घेऊन अनावश्यक पणे रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. म्हणून पालघर जिल्हाधिका-यांनी हे पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. Coronavirus In Maharashtra: 162 नव्या कोरोना रुग्णांसह महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या 1297 वर पोहचली

त्यामुळे आता पुढील आदेश येईपर्यंत ही पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचे 162 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 1297 वर पोहचली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे. आरोग्य सुविधांकडे राज्य सरकार विशेष लक्ष देत आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 540 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 5734 वर पोहचला आहे. तर 17 जणांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान बरे झालेल्या 473 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात आतापर्यंत 166 कोरोना बाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.