Vasai: अश्लील व्हिडीओ काढून विवाहित महिलेस ब्लॅकमेल; वसईतील तरुणास मनसे कार्यकर्त्यांनी शिकवला धडा
Rape | Representational Image (Photo Credits: ANI)

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, राज्यातील महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचपार्श्वभूमीवर विवाहित महिलेचा अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणास मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या तरूणाच्या शारीरीक आणि मानसिक त्रासाला वैतागून संबंधित महिलेने अखेर मनसे पदाधिकारी प्रफुल कदम यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी या तरुणाला गाठून त्याला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज थोरात असे आरोपीचे नाव असून तो मुंबईच्या चुनाभट्टी येथील रहिवाशी आहे. तर, पीडित महिला मुंबईत राहायला असताना त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच तिचे अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपीच्या या त्रासाला वैतागून पीडिता वसई नायगाव येथे राहायला आली होती. मात्र, तरीही आरोपीचे तिला त्रास देणे सुरुच होते. ज्यामुळे पीडिताने अखेर मनसे पदाधिकारी प्रफुल कदम यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मुंबईजवळच्या वसई-नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली आहे. हे देखील वाचा- Nitesh Rane Letter to Kishori Pednekar: मुंबई मधील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन नितेश राणे यांचे महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र; दिला 'हा' इशारा

याआधी, नवोदित अभिनेत्रीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कपडे फाटेस्तोर चोपलं होतं. या प्रकरणाचे व्हिडीओ देखील समोर आले होते, अशी माहिती टीव्ही9 मराठीने आपल्या वृत्तात दिली आहे.