राज्यात आज सकाळपासून अपघाताचे सत्र हे सुरु आहे. पहाटे बुलढाण्यातील मलकापूरात दोन खासगी बसचा भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर आता पुण्यातील निरा देवघर धरणात कार कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या कारमध्ये तीन प्रवासी प्रवास करत होते. या तिघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झालाय. भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत ही घटना घडली. मोटारीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते त्यापैकी एक जण बचावला असून तिघेजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा - Buldhana Bus Accident: बुलढाण्यात दोन खासगी बसचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 25 ते 30 जण जखमी)
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने बंदी घातली असतानाही ही कार गेली कशी? हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. नेमकी घटना कशाने घडली हे आता लवकरच समोर येणार आहे. अपघातग्रस्त हे पुण्यातील रावेत येथील असल्याचे समजते. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी रवाना झालेले आहेत.