Buldhana Bus Accident

बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana Accident) मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लक्ष्मी नगर उड्डान पुलावर ही दुर्देवी घटना शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू आहे. बुलढाण्यात खासगी बसचा अपघात होण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. (हेही वाचा - Yavateshwar Ghat Accident: यवतेश्वर घाटात दोन कारचा अपघात, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू)

एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

दरम्यान जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी आपल्या वाहनातून जखमींना घेऊन मलकापूर रुग्णालयात दाखल केले. जखमींचा जीव वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. दरम्यान, अपघातातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.