Mumbai Local Train | (File Image)

मुंबई लोकल सेवेत (Mumbai Local Trains) आता ऐतिहासिक बदल होऊ घातला आहे. मुंबई लोकल मार्गावरुन लवकरच 'वंदे मेट्रो' ( Vande Metro) धावताना दिसणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी (19 मे) याबाबत तसे आदेश दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या आदेशानुसार मुंबई लोकल अद्ययावत केली जाणार आहे. त्यासाठी मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (Mumbai Urban Transport Project) 3 आणि 3A अंतर्गत वंदे मेट्रो (उपनगरीय) च्या 238 गाड्या खरेदी करण्याचा आदेश भारतीय रेल्वेने दिला आहे.

अद्ययावत केल्या जाणाऱ्या गाड्या नियमितपणे रेल्वे कारखान्यांद्वारे तयार केल्या जाणार नाहीत. मात्र त्या मेक इन इंडिया (Make in India) मार्गदर्शक तत्त्वांची खात्री करून त्यांच्या स्वत:च्या कारखान्यांमध्ये/कामांमध्ये तंत्रज्ञान भागीदाराद्वारे विकसित केल्या जातील, असे समजते. मीडडे आणि टाईम्स नाऊ सारख्या वेबसाईट्सनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मंत्रालयाने मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनला आदेशाची अंमलबजावणी करून पुढील 35 वर्षांसाठी कठोर देखभाल आवश्यक असलेल्या प्रकल्पासाठी निविदा मागवण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा, Mumbai Local 14-Hour Block: पश्चिम रेल्वेवर 14 तासांचा ब्लॉक जाहीर; अनेक गाड्यांवर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, मुंबई लोकल सेवेमध्ये बदल व्हावा अशी मागणी नेहमीच होत आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने मुंबई आणि उपनगरांतील अनेक रेल्वे मार्गांवर वातानुकुलीत लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला नागरिकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. उलट वातानुकुलीत रेल्वे सेवांचे तिकट दर अधिक असून या सेवा सर्वसामान्यांना परवडत नाहीत. शिवाय वातानुकुलीत रेल्वे गाड्यांमुळे नियमीत चालणाऱ्या लोकल सेवांवर मोठा परिणाम होतो, असेही नागरिकांचे म्हणने होते. यावर मुंबई आणि ठाणे, कळवा आदी ठिकाणच्या प्रवाशांनी आंदोलनेही केली होती. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबईतून वातानुकुलीत रेल्वे मागे घ्याव्या असे म्हटले होते. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळवा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रवाशांना सोबत घेऊन आंदोलन केले होते. त्यानंतर रेल्वेने काही वातानुकुलीत रेल्वे मागे घेतल्या होत्या.