सध्या जेव्हा कधी ट्रेनने प्रवास करण्याची वेळ येते तेव्हा, लोक इंटरनेटवर वंदे भारत ट्रेनबद्दल (Vande Bharat Trains) शोधतात. आपल्याला जिथे प्रवास करायचा आहे तिथे वंदे भारत ट्रेन जाते की नाही, याबाबत माहिती घेतली जाते. दिवसेंदिवस वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता वाढत आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही जवळजवळ विमानासारखी सुविधा असलेली देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन आहे. आता या ट्रेनबाबत पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भविष्यात पुण्याहून नवे 4 वंदे भारत एक्स्प्रेसचे मार्ग सुरु होणार आहेत.
अहवालानुसार, 28 डिसेंबर 2024 रोजी, रेल्वे कंपनीने पुण्याला सेवा देण्यासाठी चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची घोषणा केली, ज्यामुळे इथल्या एकूण वंदे भारत गाड्यांची संख्या सहा झाली. सध्या, पुणे वंदे भारत ट्रेनद्वारे कोल्हापूर, हुबळी आणि सोलापूरसारख्या ठिकाणांशी जोडलेले आहे.
पुण्याहून सुरु होणाऱ्या वंदे भारत ट्रेन्स-
पुणे-शेगाव
पुणे-वडोदरा
पुणे-सिकंदराबाद
पुणे-बेळगावी
हे नव्याने जोडलेले मार्ग प्रवासाच्या वेळेत कमालीची घट आणि प्रवाशांना अधिक सुविधा देणारे आहेत. या अतिरिक्त वंदे भारत गाड्या सुरू केल्याने पुणेकरांना आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल. या मार्गांमुळे जोडलेल्या प्रदेशांमध्ये पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे पर्यटकांसाठी आरामदायी आणि कार्यक्षम वाहतुकीचे साधन उपलब्ध होईल. हा विस्तार भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी, विशेषत: पुण्यासारख्या उच्च मागणी असलेल्या शहरांमध्ये, सरकारची वचनबद्धता अधोरेखित करतो. (हेही वाचा: Aviation Services and Airports in Maharashtra: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! समोर आली पुरंदर विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख; जाणून घ्या राज्यातील इतर विमानतळांबाबत नवीनतम अपडेट्स)
मात्र मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या पुण्यामार्गे कोणत्याही नवीन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची कोणतीही योजना नाही. वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहून कोणत्याही नवीन मार्गावर सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस नवीन मार्गांवर सुरू होण्यासाठी पुणेकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा पहिला प्रवास दिल्ली ते वाराणसी दरम्यान सुरू झाला. आत्तापर्यंत 136 वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात वेगवेगळ्या मार्गांवर चालवल्या जात आहेत. याशिवाय इतरही अनेक मार्ग आहेत ज्यावर या ट्रेनचे संचालन अद्याप पाइपलाइनमध्ये आहे. सध्या प्रवाशांना दिल्ली ते श्रीनगरदरम्यानच्या वंदे भारत एक्स्प्रेसची प्रतीक्षा आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते श्रीनगर हे अंतर अवघ्या 13 तासात पूर्ण करेल. विशेष बाब म्हणजे ही ट्रेन चिनाब रेल्वे पुलावरून जाईल, जो जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे.