Vandalism at Rajgruha: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' याची तोडफोड करणाऱ्या दोषींविरुद्ध कडक कारवाईचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

काल (7 जुलै) संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या दादर (Dadar) येथील निवासस्थान राजगृहाची (Rajgruha) काही अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली असून कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. तसंच राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. "राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजिना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीसांना दिले आहेत." असे मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

काल संध्याकाळी काही अज्ञातांकडून राजगृहात तोडफोड करण्यात आली. यात सीसीटीव्ही कॅमेरे, फुलांच्या कुंड्या यांची नासधूस करण्यात आली. याप्रकरणी माटुंगा पोलिस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे घर राजगृह आता संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे. (मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' येथील तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांकडून अज्ञातांविरूद्ध FIR दाखल)

CMO Maharashtra Tweet:

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीम अनुयायींना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तसंच दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे.