
'व्हॅलेंटाईन डे' (Pune Valentine) विरोधाचे प्रमाण अपवाद वगळता पाठीमागील काही वर्षांमध्ये बरेच कमी झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जोडपी अत्यंत मोकळेपणाने 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day 2023 ) साजरा करत आहेत. पुण्यातील काही जोडप्यांनी तर हा दिवस एखाद्या मुहूर्ताप्रमाणे साजरा केला आहे. पुण्यातील (Pune) जवळपास 40 जोडपी 'व्हॅलेंटाईन डे'चा मुहूर्त साधत विवाहबद्ध होत आहेत. या सर्वांचा विवाह सोहळा विवाह नोंदणी कार्यालय पुणे येथे संपन्न होतो आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश जोडपी कुटुंबीयांच्या संमतीने विवाहबद्ध होत आहेत. या विवाहासाठी विशेष असा कोणताही मंडप, वऱ्हाडी अथवा वाजंत्री असा कोणताही तामजाम नाही. त्यामुळे अत्यंत साधेपणाने असला तरी एकमेकांच्या प्रेमाचा उपहार करत ही जोडपी आयुष्याच्या लग्नगाठी बांधत आहेत.
विवाह नोंदणी कार्यालयात या विवाहासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याचे समजते. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत विवाह आटोपणाऱ्या जोडप्यांची नोंदणी कार्यालयात केली जाईल. तसेच, या जोडप्यांना जागेवरच विवाह प्रमाणपत्र देण्याची तयारीही कार्यालयाने दर्शवली आहे. दरम्यान, या जोडप्यांचा विवाह सामाजिक संदेशाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असणार आहे. विवाहाच्या नावाखाली वारेमाप केल्या जाणाऱ्या खर्चाला पायबंध घालण्याच्या उद्देशाने असे विवाह काळाची गरज बनल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत. (हेही वाचा, Valentine's Week: प्रेमास मिळालेला नकार कसा स्वीकाराल? 'व्हॅलेंटाईन विक'मध्ये खचून जाऊ नका, समजून घ्या)
पंचाग, मुहूर्ताला फाटा
दरम्यान, विवाह म्हटलं की अनेकांना आपली परंपरा आठवते. या परंपरेत मुहूर्त, पंचाग आण इतर चालिरीती असतात. यात मग आहेरमाहेर, मंडप, वाजंत्री, जेवणावळी, वरात आणि इतर अनेक गोष्टी येतात. या जोडप्यांनी या सगळ्यांना फाटा देत अत्यंत साधेपणाने विवाह करण्याचे योजले. त्यामुळे या मंडळींचा खर्चही वाचला. शिवाय भविष्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक हातभारही लागणार आहे.
जगभरातील अनेक जोडपी व्हॅलेंटाईन डेची वर्षभर वाट पाहात असतात. अनेकांना आपल्या मनातील समोरच्याप्रती असलेल्या भावना व्यक्त करायच्या असतात. अनेक जोडप्यांना व्हॅलेंटाईन विक एखाद्या सण, उत्सवाप्रमाणे साजरा करायचा असतो. या पार्श्वभूमीवर जगभरातील जोडप्यांसाठी व्हॅलेंटाईन विक.. त्यातही व्हॅलेंटाईन डे अत्यंत महत्त्वाचा ठरतो.