महाराष्ट्र शासनाकडून 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्यास सध्या सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबईत (Mumbai) सध्या लसींचा साठा अपुरा असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर कोरोना लसीच्या डोसचा अपुरा साठा असल्यामुळे मुंबईत पुढचे किमान 3 दिवस लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. तसेच ज्या नागरिकांनी नोंदणी केली आहे आणि ज्यांचा दुसरा डोस आहे, अशाच नागरिकांना लसीकरणामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
"मुंबईतील कोरोना लसींचा साठा संपत आला आहे. यामुळे मुंबईत पुढचे दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईतल्या सर्वच केंद्रावर लसीकरण बंद ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुंबईला मिळालेल्या 76 हजार लसींपैकी 50 हजार आज दुपारपर्यंत संपले आहेत. यामुळे पुढील साठा मिळेपर्यंत लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी प्रसारमाध्यांना दिली आहे. महत्वाचे म्हणजे, आधी कोविन अॅपवर नोंदणी करावी किंवा संकेतस्थळावर करावी. त्यानंतरच दिलेल्या तारखेला लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी", असेही आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. हे देखील वाचा- माझं वर्षभराचं मानधन मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार- बाळासाहेब थोरात
आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दोन तृतीयांश नागरिकांना लस दिल्यानंतरच कोरोनावर नियंत्रण आणले जाऊ शकते. परंतु, राज्यातील 9 कोटी नागरिकांपैकी केवळ 1.5 जणांनाच लस देण्यात आल्या आहेत, ज्या खूपच कमी आहेत. जर आपण लसीकरणाची गती वाढवली नाही तर, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. सध्या काही लोक बेफिकीर झाले आहेत. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला चालना मिळाली आहे, असेही ते म्हणाले आहेत
महाराष्ट्रात काल (28 एप्रिल) 63 हजार 309 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर नव्या 61 हजार 181 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 37 लाख 30 हजार 729 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 73 हजार 481 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.4% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.