महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील रुग्णालयांमध्ये विविध स्तरांवर डॉक्टरांची 20,402 पेक्षा जास्त पदे रिक्त (Vacant Posts Of Doctors) आहेत. या रुग्णालयांमध्ये एकूण पदांची मंजूर संख्या 57,714 आहे. त्यापैकी सुपर स्पेशालिटी संवर्गातील 1,707 मंजूर पदांपैकी 893 पदे रिक्त आहेत. राज्य सरकारच्या चार विभागांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून रिक्त पदांची बाब उघड झाली आहे.
याआधी नांदेड आणि संभाजीनगर येथील दोन सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या झालेल्या मृत्यूनंतर न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची दखल घेतली होती. आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या चार वेगवेगळ्या विभागांनी दाखल केलेल्या शपथपत्रांद्वारे मंजूर पदे व रिक्त पदांची आकडेवारी समोर आली. हायकोर्टाने हे प्रकरण 7 डिसेंबरला सुनावणीसाठी ठेवले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 30 सप्टेंबरपासून 48 तासांत अनेक अर्भकांसह 31 रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्टोबर 2-3 रोजी 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे (एमईडीडी) प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, रुग्णांच्या मृत्यूच्या घटनांनंतर लगेचच डॉ. दिलीप म्हैसेकर (डीएमईआरचे संचालक) आणि इतर अनेक वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती.
समितीने रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास केला आणि रुग्णालयाच्या वतीने कोणतेही निष्काळजीपणा नसल्याचे निरीक्षण नोंदवले, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, औषधे आणि उपकरणे खरेदीसाठी 2023-24 साठी 8,674.85 कोटी रुपये बजेट ठेवण्यात आले आहे. नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी 3 कोटी रुपये, किट आणि अभिकर्मकांसाठी 1.16 कोटी रुपये आणि औषधे आणि शस्त्रक्रिया उपकरणांसाठी 5.54 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (हेही वाचा: Lek Ladki Yojana: मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात सुरु झाली ‘लेक लाडकी’ योजना; मिळणार 75 हजार रुपये रोख, जाणून घ्या अटी, शर्ती व आवश्यक कागदपत्रे)
छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी संबंधित मंजूर रक्कम 12 कोटी 10 लाख रुपये होती. रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला सामान्य प्रशासन विभागाकडून भरतीसाठी आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 13 सप्टेंबर रोजी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. या वर्षी डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.