Urmila Matondkar.(Photo Credit: Instagram)

लोकसभा निवडणुक 2019 (Lok Sabha Elections 2019) मध्ये बहुचर्चित ठरलेली उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) विरुद्ध भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांची मतांची शर्यत अखेरीस संपुष्टात आली आहे. या चढाओढीच्या स्पर्धेत उर्मिला मातोंडकर यांचा तब्बल साडे तीन लाख मतांच्या फरकाने पराभव झालेला आहे तर गोपाळ शेट्टी यांच्या गळ्यात 2014 प्रमाणेच पुन्हा एकदा विजयी माळ पडल्याचे समोर येत आहे. मात्र या पराभवानंतर देखील खिलाडू वृत्ती दाखवत उर्मिला हिने माध्यमांच्या समोर येऊन गोपाळ शेट्टी यांचे अभिनंदन केले आहे, तसेच माझा पराभव मी मान्य करते व त्यासाठी कोणताही रडीचा डाव खेळायची मला गरज नाही असे देखील उर्मिलाने सांगितले.

ANI ट्विट

एकीकडे राजकारणाचा अनुभव असणारे गोपाळ शेट्टी आणि मग बॉलिवूड मधून थेट राजकारणाच्या पडद्यावर झळकलेली उर्मिला मातोंडकर ही खरतर अगदी तोलामोलाची उमेदवार मंडळी होती. उमेदवारी घोषित झाल्यापासूनच उर्मिला ने जनसामान्यांमध्ये प्रचाराला दमदार सुरवात केली , त्यावेळी लोकांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता, मात्र अखेरीस शेट्टी यांचा अनुभव वरचढ होऊन उर्मिलाला पराभव पत्करावा लागला. पण उर्मिलाने हा एकूण अनुभव हा खूप काही शिकवून देणारा होता, तसेच गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्तांनी केलेली मेहनत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली त्यामुळे मी आता फक्त त्यांचे अभिनंदन करू इच्छिते असे म्हणत आपल्या खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवून दिले.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

यंदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याप्रकरणी बोलताना, उर्मिला सांगते की, "आताही जनता मला कोणीतरी हरलेली व्यक्ती म्हणून बघत नाही यातच माझा विजय आहे शिवाय मी निवडणुकीत उतरल्यावरच सांगितले होते की मी इथून मागे जायला आलेले नाही त्यानुसार यापुढे देखील मी लोकांची सेवा करणे कायम ठेवणार आहे." याशिवाय माध्यमांनी किंवा लोकांनी केलेल्या टिप्पण्यांनी मला साडे चार लाखाहूनही जास्त मतांच्या फरकाने हरण्याची भीती होती त्यापेक्षा हा पराभव नक्कीच कमी आहे. हे माझे राजकारणातले पदार्पण आहे जे अगदी दमदार झाले आहे आणि ते यापुढेही तसेच टिकवून ठेवणार असल्याचे उर्मिला मातोंडकर हिने स्पष्ट केले आहे.