Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या एका कार्यक्रमाला विरोध करणारे शेतकरी व भाजप कार्यकर्ता यांच्यामध्ये मोठी झटापट झाली. यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या येथील परिस्थिती तणावपूर्ण असून, घटनास्थळीच शेतकरी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. जिल्हाधिकारी डॉ अरविंद कुमार चौरसिया, एसपी विजय धुळ आणि एडीजी आयजी लक्ष्मी सिंह तेथील शेतकऱ्यांशी बोलत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) या घटनेची निंदा केली आहे. याबाबत अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट केले आहे.

शरद पवार यांनी म्हटले आहे की, ‘हा आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा अतिशय निर्घुण मार्ग आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेचा मी तीव्र निषेध करतो.’

दुसरीकडे नवाब मलिक यांनी म्हतके आहे की, ‘भाजपचे केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलाच्या ताफ्याचा भाग असलेल्या कारने चिरडल्याने अनेक शेतकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, तसेच अनेक जण जखमी झाले. ही घटना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात घडली आहे. भाजप मंत्री, त्यांचा मुलगा आणि समर्थकांनी केलेले हे क्रूर कृत्य अत्यंत निंदनीय आहे आणि आमच्या शेतकऱ्यांविरुद्धच्या या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगारांवर IPC कलम 302 चा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे.’

लखीमपूर खेरीमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम होता, त्यानंतर ते गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या गावी एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. ही माहिती मिळताच शेतकरी नेते उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी जमले होते. या दरम्यान, टिकुनिया गावाजवळ भाजप समर्थकांच्या वाहनाने काही शेतकरी जखमी झाले. यानंतर, संतप्त शेतकऱ्यांनी गाडीला आग लावली ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम मध्यंतरी थांबवण्यात आला. (हेही वाचा: केंद्रीय मंत्री Ajay Mishra यांचा मुलगा Ashish Mishra ने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप; 3 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी)

घटनास्थळी डीएम, एसपीसह कडक पोलीस फौजफाटा तैनात आहे. दुसरीकडे, भारतीय किसान युनियनने आरोप केला आहे की, तीन शेतकऱ्यांना गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या वाहनाने पायदळी तुडवले आहे.