अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी (Arun Gawli) याचा भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी गवळी यांच्या इतरही शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता. दरम्यान, महाराष्ट्रातील इतरही अनेक ठिकाणी विविध कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांच्या पक्षप्रवेशाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विटरवरुन माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, 'मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला' आहे. त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर विभागातील सेंचुरी रेयॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sandeep Deshpande Statement: शिवसेनेने राज ठाकरेंना मारण्याचा कट रचला होता, संदीप देशपांडेंचे खळबळजनक विधान)
ट्विट
त्यासोबतच #ठाणे जिल्ह्यातील #उल्हासनगर विभागातील सेंचुरी रेयॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/TwWNS1Jdje
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 25, 2023
एकनाथ शिंदे यांन या वेळी बोलताना म्हटले की, आमचं सरकार हे लोकांचं सरकार आहे. त्यामुळे आपल्या सर्व समस्या विचारात घेऊन आपले मार्गदर्शन करुन निर्णय घेतले जातील. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की, पाठिमागील सहा-सात महिन्यांमध्ये आपण बाळासाहेबांच्या विचारांच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे जिल्हा, तालुका, गाव, खेडे अशा विविध ठिकाणांहून लोकांचा ओढा शिवसेनेकडे वाढत आहे. हे सर्व लोक शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. याशिवाय महाराष्ट्राबाहेर असलेल्या लोकांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे. हा आपल्यावर लोकांनी दाखवलेला विश्वास असल्याचेही एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले.