महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत, 20 जुलैअखेर 27.38 लाख खातेदारांना मिळाला 17, 646 कोटी रुपयांचा लाभ
Mahatma Jotirao Phule Farmers Debt Relief Scheme (PC - Twitter)

मागच्या वर्षी नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची (Mahatma Jotirao Phule Shetkari Karjmukti Yojna) घोषणा केली होती. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना मदत आणि शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत कर्ज मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार, या कर्जमुक्ती योजनेत 32.90 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. 20 जुलै 2020 अखेर 27.38 लाख खातेदारांना 17,646 कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील 83 टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे.

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत राज्यातील सर्व छोटे-मोठे शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी ठरणार आहेत. हा लाभ घेताना शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीसाठी कोणतीही अट ठेवली नाही. त्यामुळे कर्जमाफीची थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 21, 467 कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी 17, 646 कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे. (हेही वाचा: कोरोना काळात नियम पाळून एसटीने कोकणात जाता येणार- अॅड. अनिल परब)

योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये तसेच बँकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी 2019-20 या आर्थिक वर्षात जवळजवळ 19 लाख खातेदारांना 11, 993 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता. यासह 2020-21 या आर्थिक वर्षात एकूण 5,653 कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. यामध्ये विविध कारणास्तव काही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही, त्यांच्या खात्यावरही लवकरच कर्ज मुक्तीची रक्कम जमा होणार आहे.