Representational Image | (Photo Credits: PTI)

कामाचे पैसे मागायला गेल्या म्हणून मालकाने चक्क मजुराची हत्या (Murder) केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर (Ulhasnagar) येथे सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मजुर व्यक्ती हा कामाची थकबाकी मागण्यासाठी आरोपींच्या घरी आला गेला होता. याच रागातून आरोपींनी मजुराला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

मनोज हटकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, बंटी साबळे आणि राहुल घाडगे असे आरोपींची नावे आहेत. मनोज हा रंगकाम करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करायचा. गेल्या काही दिवसांपासून बंटी राहुल आणि मनोज हे मिळेल त्या ठिकाणी रंगकाम करत होते. मात्र, मनोजने केलेल्या रंगकामाच्या मजुरीचे 1200 रुपये बंटी आणि राहुल यांना देणे लागत होते. तसेच मनोजची आर्थिक तंगी असल्याने वारंवार पैशांची मागणी तो दोघांकडे करत होता. मात्र, बंटी आणि राहुल त्याकडे कायम टाळाटाळ करत होते. मात्र, मनोज सोमवारी कामाचे पैसे मागण्यासाठी त्यांच्या घरी गेला. याचाच राग आल्याने दोघांनीही मनोजला लाथाबुक्क्यांनी काही तास बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनोजचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai: धक्कादायक! धारावी परिसरात मुलाने केली आईच्या प्रियकराची हत्या

याप्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने उल्हासनगरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस निरीक्षक मोहन खंदारे याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.