Ulhasnagar Building Collapse: उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु
Ulhasnagar Building Collapse (Photo Credits: ANI)

ठाणे जिल्ह्यातील (Thane District) उल्हासनगर (Ulhasnagar) मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बचावकार्य सुरु असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) दिली आहे. साई शक्ती (Sai Shakti) या 5 मजली इमारतीचा चौथ्या मजल्यावरील स्लॅब आज रात्री  कोसळल्याने ही दुर्घटना घडली. ही इमारत उल्हासनगर मधील कॅम्प 2 परिसरात आहे.

पोलिस, अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. अद्याप एका व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. अजून दोन व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Building Collapses in Dombivli: रात्रभर वेब सीरीज पाहण्याच्या एका तरूणाच्या सवयीमुळे वाचले तब्बल 75 जणांचे प्राण)

ANI Tweet:

उल्हासनगरमध्ये इमारत कोसळण्याची या महिन्यातील ही दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी  कॅम्प एक भागात असलेली मोहिनी पॅलेस या चार मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यात इमारतीतील 15 नागरिक अडकले होते. त्यातील 11 जणांना सुखरुपणे बाहेर काढण्यात आले होते. मात्र यात 12 वर्षीय मुलासह 4 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ही इमारत अनधिकृत होती.