लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, पक्षांकडून आपापल्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. आता महत्वाचा आहे तो प्रचार. युपीनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे 48 जागा आहेत. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून दणक्यात प्रचारसभा घेण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 2 दिवसांच्या पालघर जिल्ह्यात संपर्क दौऱ्यावर होते, त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा विदर्भाकडे वळवला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात एकूण 8 सभा घेणार आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कमीत कमी 98 सभा घेतील असा अंदाज आहे.
उद्धव ठाकरे यांच्या 7 एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यात दोन, 8 एप्रिल रोजी यवतमाळ जिल्ह्यात दोन अशा 4 सभा होणार आहेत. त्यानंतर 9 एप्रिल रोजी मुंबईमध्ये त्यांची पहिली सभा पार पडेल. भाजप-सेनेच्या युतीने कोल्हापूर येथून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या पालघर जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात तब्बल 600 किलोमीटर परिसरातील गावागावात जाऊन त्यांनी पालघरवासीयांशी संवाद साधला. (हेही वाचा: उद्धव ठाकरे म्हणतात 'आम्ही दगा दिला नाही, तुम्ही देऊ नका; युतीची सत्ता आल्यावर अधिकार आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप होणार')
असे असेल सभांचे वेळापत्रक
> रविवार, 7 एप्रिल
लोकसभा क्षेत्र – रामटेक
सायंकाळी 5 वाजता – कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगण, कळमेश्वर शहर.
सायंकाळी 7 वाजता – तेजाब कंपनी ग्राऊंड कन्हान.
> सोमवार, 8 एप्रिल
लोकसभा क्षेत्र – यवतमाळ
दुपारी 3 वाजता – वणी.
सायंकाळी 6 वाजता – पोस्टल ग्राऊंड, समता मैदान, यवतमाळ
> मंगळवार, 9 एप्रिल
लोकसभा क्षेत्र – दक्षिण मुंबई
सायंकाळी 6 वाजता – महालक्ष्मी रेसकोर्स
महाराष्ट्रात विदर्भमध्ये 10 जागा, मराठवाड्यात 8, उत्तर महाराष्ट्रात 6 आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथे प्रत्येकी 12 जागा आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे नेते पोहोचावे म्हणून दोघे स्वतंत्र सभा घेणार आहेत.