मुंबई: DIG निशिकांत मोरे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावणार्‍या तरूणीला उद्धव ठाकरे यांच्या ड्रायव्हर कडून धमकी; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून वाहनचालक  बडतर्फ
Nishikant More And Uddhav Thackeray (Photo Credits: Archieved, Edited)

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील तळोजा (Taloja) भागात राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या मोटार परिवहन (एमटी) विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे (Nishikant More) यांचे प्रकरण सध्या बरेच तापले आहे. 6  जानेवारी रोजी ही मुलगी सुसाईड नोट लिहून अचानक बेपत्ता झाल्याने हे प्रकरण आणखीनच चिघळले गेले होते. यामध्ये एक महत्वाचा ट्विस्ट म्हणजे संबंधित तरुणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांच्या ड्रायव्हर कडून धमकावले गेल्याने ती बेपत्ता झाली अशी चर्चा आहे. संबंधित वाद अजून वाढण्याआधी या ड्रायव्हरला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून काढून टाकण्यात आले आहे. नवी मुंबईः 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस उपमहानिरीक्षकावर POSCO अंतर्गत गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

प्राप्त माहितीनुसार,उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात पोलीस हवालदार दिनकर साळवे यांची ड्रायव्हर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. साळवे हे उद्धव यांचे निकटवर्तीय असून शिवसेने स्थापनेपासून बाळासाहेब व ठाकरे परिवाराच्या जवळ होते. त्यांनी बाळासाहेबांच्या सुरक्षा पथकात सुद्धा काम केले होते. नागपाडा मोटार परिवहन खात्यात काही काळ काम करत असताना त्यांची आणि निशिकांत मोरे यांची ओळख झाली होती. आता मोरे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लगावल्यावर साळवे अशा प्रकारे त्यांच्या मदतीसाठी धमकावण्यास गेले होते असे म्हंटले जात आहे.

दरम्यान, येत्या मंगळवारी निशिकांत मोरे यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या विरुद्ध पनवेल कोर्टात सुनावणी होणार होती. या दरम्यान मुलीने अथवा तिच्या कुटुंबाने अधिक काहीही बोलू नये अशी धमकी साळवे यांच्याकडून दिली गेली असा आरोप आहे. माध्यमांच्या समोर काहीही बोलू नये असे या ड्रायव्हरने सांगितल्याचे मुलीच्या कुटुंबाने सांगितले होते. मुलीने स्वतः कुटुंबासोबत मिळून साळवे यांच्या विरुद्ध तळोजा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्यावर हा प्रकार समोर आला.