उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, महाविकासआघाडीकडून अधिकृत घोषणा; 'या' दिवशी शिवतीर्थावर पार पडणार ग्रँड शपथविधी सोहळा
Uddhav Thackeray, Shiv Sena party chief | (Photo Credit: File Photo)

महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी (Chief Minister) विराजमान होणार आहे. आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार कार्यरत होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आजच्या संयुक्त बैठकीत नेतेपदी तसेच राज्याचे आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचा ग्रँड शपथविधी सोहळा 28 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर पार पडेल. राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेची संयुक्त बैठक हॉटेल ट्रायडंट येथे पार पडत आहे. यामध्ये तीनही पक्षांनी मिळून काही ठराव पार पडले ज्याला इतर पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले.

शरद पवार यांनी पहिल्यापासूनच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठींबा दिला होता. आज जयंत पाटील यांनी या गोष्टीची अधिकृत घोषणा केली. यावेळी तीनही पक्षांसोबत इतरही पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते. सत्तास्थापनेच्या शर्यतीमधून भाजप बाहेर पडल्याने, आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार आजच महाविकासआघाडी सत्ता स्थापन दावा करण्याची शक्यता आहे. उद्या या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नवे उपमुख्यमंत्री आणि सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. (हेही वाचा: उद्या सकाळी 8 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन; पार पडणार उद्धव ठाकरे आणि आमदारांचा शपथविधी)

भाजपने तोडफोडीचे राजकारण केले याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यावर निकाल देताना उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे असे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता महाविकासआघाडी आपली सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. ज्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेन भाजपसोबतची युती तोडली, ती गोष्ट आता मोठ्या अभिमानाने शिवसेनेला मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांनीही आपण मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करतो असे सांगितले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा उद्धव ठाकरे यांच्या रूपाने पूर्ण होणार आहे.