उद्या सकाळी 8 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन; पार पडणार उद्धव ठाकरे आणि आमदारांचा शपथविधी
विधान भवन मुंबई (फोटो सौजन्य-ट्वीटर)

अखेर 79 तासांनंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सत्तास्थापनेच्या शर्यतीमधून भाजप बाहेर पडल्याने, आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार उद्या महाविकासआघाडी सत्ता स्थापन करेल. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी उद्या विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. उद्या सकाळी 8 वाजता या विशेष सत्राचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरें, उपमुख्यमंत्री आणि सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकासआघाडीकडून महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव निश्चित केले आहे.

आज संध्याकाळी महाविकास आघाडीची एक महत्वाची संयुक्त बैठक पार पडणार आहे. त्यानंतर रात्री सत्तास्थापनेचा दावा केला जाईल व उद्या उद्धव ठाकरे यांचा शपथविधी पार पडेल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा ग्रँन्ड शपथविधी शिवतीर्थावरही पार पडणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान TV9 ला त्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी आपण या नव्या सरकारमध्ये नसणार असे सांगितले आहे. ते पक्षात राहतील मात्र त्यांनी स्वतः आपण सरकारमध्ये कोणतीही भूमिका पार पडणार नसल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: अजित पवार यांची होणार घरवापसी? महाविकासआघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता

अजित पवार यांचा बंडाचा फायदा भाजपला झाला नाही. यामुळे अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेची संयुक्त बैठक आज संध्याकाळी पार पडणार आहे. आता या बैठकीला अजित पवारही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीस 170 आमदार एकत्र येणार आहेत. आज सत्ता स्थापनेचा दावा केल्यावर उद्या बहुमत सिद्ध केले जाईल.