
गेले 1 महिना चालू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष नाट्याचा शेवटचा अंक चालू असलेला दिसून येत आहे. कालच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणविस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता महाविकासआघाडीसाठी सत्ता स्थापनेचा मार्ग पूर्णतः मोकळा झाला आहे. याबाबत महाविकासआघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये संयुक्त बैठक होत आहे. या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर अजित पवार पुन्हा घरवापसी करणार असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस (NCP-ShivSena-Congress) पक्षांमध्ये सत्तास्थापनेची बोलणी चालू असताना, अजित पवार यांनी बंड केले व राष्ट्रवादीचे आमदार फोडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या घटनेनंतर महाविकासआघाडीने पुन्हा जुळवाजुळव करून सत्तास्थापनेच्या शर्यतीत आपले स्थान बळकट केले. काल तीनही पक्षांचे 162 आमदार प्रथमच एकत्र आले होते. त्यानंतर आता भाजपने विरोधी बाकावार बसण्याचे मान्य करीत देवेंद्र फडणविस यांनी राजीनामा दिला. (हेही वाचा: अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा; विश्वासमत सिद्ध करताना भाजप 'क्लिन बोल्ड' होण्याची शक्यता)
अजित पवार यांचा बंडाचा फायदा भाजपला झाला नाही. यामुळे अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेची संयुक्त बैठक आज संध्याकाळी पार पडणार आहे. आता या बैठकीला अजित पवारही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीस 170 आमदार एकत्र येणार आहेत.