'आजचा ठाणे दौरा हा राजकीय दौरा नाही. आज येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन आहे. त्यामुळे आज ठाणेकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. लवकरच ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घेण्यासाठी येणार आहे, अशी घोषणा शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर (Uddhav Thackeray Thane Visit) आहेत. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना ठाणे येथील जाहीर सभेत अनेकांचा समाचार घेतला जाईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला ठाकरे यांनी दिला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी कोणाचाही नामोल्लेख केला नाही. मात्र, अप्रत्यक्षरित्या त्यांनी आपला इशारा मात्र दिला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळालाही भेट देत अभिवादन केले.
उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. त्यानी ठाण्यातील वेगवेगळ्या जैन मंदिरांना भेटी दिल्या. तिथे आयोजित उत्सवातही ते सहभागी झाले. दरम्यान, आरोग्य शिबीराच्या उद्घाटनावेळी बोलताना ठकरे यांनी राजकीय भाष्यही केले. ते म्हणाले आज मी काहीराजकीय बोलणार नाही. पण, मधल्या काळात जे काही झाले ते निष्टेच्या नावाखाली झूल पांघरलेले लोक होते. ते गेले ते बरे झाले. त्यामुळे तुमच्यासारखे धगधगते निखारे मला भेटले. यातून शिवसेना आणखी जोमाने पुढे जाईल. (हेही वाचा, उद्धव ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थिती)
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. यावरुन कायदेशीर लढायाही सुरु आहेत. दरम्यान, या बंडानंततर उद्धव ठाकरे प्रथमच ठाणे येथे येत आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पाठिमागील अनेक वर्षे ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या रुपात शिवसेना नेतृत्वाला आव्हानही ठाण्यातूनच मिळाले आहे. त्यामुळे आजच्या ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरे काय बोलतात. पक्ष संघटना मजबूतीसाठी कोणती व्यूव्हरचना करतात याबाबत उत्सुकता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आजच्या ठाणे दौऱ्यात महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन होणार आहे. ज्याचे आयोजन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाद्वारे करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे ठाण्यात येऊन काय बोलणार याबाबत उत्सुकता असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी विचारले असात 'लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार असतो' असे म्हणत प्रतिक्रिया दिली. दरम्यान, लवकरच मंत्रीमंडळ विस्तार केला जाईल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.