शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा महाराष्ट्र दौरा (Uddhav Thackeray Maharashtra Tour) उद्यापासून सुरू होत आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (Poharadevi) येथून या दौऱ्याची सुरूवात होतं आहे. शिवसेना पक्षात पडलेली उभी फूट आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवीत येणार आहेत. पक्षातील फुटीनंतर शिंदे गटात गेलेले संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज्यात बंजारा समाजाची (Banjara Community) असलेली मतदारसंख्या आणि बंजारा समाजातील पोहरादेवीचं असलेलं अनन्यसाधारण स्थान यादृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. (हेही वाचा -Maharashtra Politics: शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांसह इतर आमदारांना नोटीस पाठवणार)
वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालूक्यातील हे स्थान बंजारा समाजासाठी सर्वोच्च आस्थेचं धर्मस्थळ आहे. बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत श्री. सेवालाल महाराजांची समाधी येथे आहे. यासोबतच समस्त बंजारा समाजाची कुलदेवता जगदंबा मातेचं मंदिर पोहरादेवीत आहे. राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या जवळपास दीड कोटींच्या आसपास आहे. त्यात बंजारा मतदारांची संख्या सुमारे 75 लाखांच्या वर आहे.
राज्यात मागच्या वर्षी जून महिन्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंना साथ दिली. यासोबतच यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळींनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. उद्धव ठाकरे यांचं पोहरादेवीत येणं या दोघांनाही ठाकरे गटाचा राजकीय इशारा असल्याचं म्हटलं जात आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यासह देशभरातील बंजारा समाजात आपली मांड घट्ट करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे.