Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (UBT) पक्षाच्या निवडणूक प्रचार गीतातील काही शब्दांवर आक्षेप घेणाऱ्या निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट सवाल केला आहे. या प्रचार गितातील 'हिंदू हा तुझा धर्म' या ओळीतील 'हिंदू' आणि कोरसमध्ये असलेले 'जय भवानी' या दोन शब्दांवर आयोगाने आक्षेप घेतला आहे. हे शब्द वगळण्यात यावेत यासाठी आयोगाने एक पत्रही पाठवले आहे. त्यावर बोलताना केंद्रातील सत्ताधारी पक्षात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना वेगळे आणि इतरानांना वेगळे नियम आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमित शाह यांचे वादग्रस्त व्हिडिओ प्रसारमाध्यमांसमोर सादर

उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना आपल्या मोबाईलच्या माध्यमांतून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भाषणाचे दोन व्हिडिओ दाखवले. ज्यामध्ये एका भाषणात 'बजरंग बली म्हणत इव्हीएमचे बटन दाबा' असे नरेंद्र मोदी म्हणत आहेत. तर, 'एकदा का भाजप सरकार आले की, सर्वांना आळीपाळीने रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला नेण्यात येईल', असे अश्वासन देताना अमित शाह दिसत आहेत. याच वक्तव्यांवर शिवसेना (UBT) पक्षाने आक्षेप नोंदवला आहे. (हेही वाचा, Mahavikas Aghadi Press Conference: महाविकासआघाडीचे जागावाटप जाहीर; शिवसेना-UBT 21, NCP (शरद पवार) 10), Congress- 17 जागांवर लढणार)

उद्धव ठाकरे यांचा थेट नकार

उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भाषेत सांगितले की, काहीही झाले तरी आम्ही शिवसेना (UBT) प्रचार गितातील 'हिंदू' आणि 'जय भवानी' हे शब्द वगळणार नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आगोदर निवडणूक आयोगाने द्यावीत. त्यानंतरच आम्हाला शब्द वगळण्याबद्दल सांगावे. धार्मिक मुद्द्यांचा वापर केला म्हणून याच निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. आता पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री पदावर असलेल्या लोकांकडूनच असा मुद्द्यांचा वापर केला जात आहे. अशा वेळी निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. हे सगळे अन्यायकारक असल्याची भावनाही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. (हेही वाचा , Sharad Pawar jibe Amit Shah: शरद पवार यांच्या गुगलीने अमित शाह बोल्ड; सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवला)

आम्ही शिवसेना (UBT) प्रचार गीतामध्ये जरुर काही शब्द वापरले. पण आम्ही राम के नाम दे दे असे म्हणत त्याचा प्रचार केला नाही. तसेच, मतेही मागितली नाहीत. केवळ कार्यकर्त्यांच्या (शिवसैनिक) स्पूर्थीसाठीच त्याचा वापर केला जाणार आहे. तरीदेखील निवडणूक आयोग अशा पद्धतीची भूमिका घेत आहे. आयोगाचे वर्तन कितपत न्यायाचे आहे, हे जनतेला दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्याचा नक्की विचार करेन असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.