Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

Uddhav Thackeray On BJP: 'कलंक' (Stigma) हा शब्द इतका झोंबेल असे वाटले नव्हते. त्यात झोंबण्यासारखे काहीच नव्हते. पण, जेव्हा तुम्ही अनेकांच्या कुटुंबावर, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करता. पुढे त्यांनाच सोबत घेऊन सरकारमध्ये मंत्री करता. हा त्यांचे कुटुंबीय, तो नेता यांना लावलेला कलंक नाही का? असा संतप्त सवाल शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला केला आहे. तुम्ही इतरांना कलंकीत करायचे आणि पक्षात घ्यायचे, सत्तेत घ्यायचे हा काय प्रकार आहे? म्हणजे भाजप (BJP) म्हणेल तो व्यक्ती कलंकीत. भाजप म्हणेल ती व्यक्ती सुसंस्कारीत? हे सगळे ठरवणारा भाजप कोण आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

गुजरातचे नेते शंकर सिंह वाघेला यांनी मुंबईमध्ये 'मातोश्री' येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. उद्धव ठाकरे यांनीही या भेटीबाबत मौन बाळगले. मात्र, या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार शरसंधान साधले. मी जर कलंकीत म्हटल्याने इतका राग येत असेल तर आजवर आपण इतरांच्या कुटुंबावर आरोप करुन लावलेल्या कलंकाचे काय? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर आक्रमक होत जोरदार निशाणा साधला आहे. (हेही वाचा, Shinde-Fadnavis-Pawar Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस-पवार मंत्रिमंडळ विस्तार; उद्याचा मुहूर्त विधिमंडळाच्या प्रोटोकॉल विभागाला तयारीच्या सूचना, सूत्रांची माहिती)

नागपूर येथे बोलताना काल (10 जुलै) उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. भाजपवर निशाणा साधताना देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख उद्धव यांनी नागपूरला लागलेला कलंक अशा शब्दात केला होता. त्यावरुन भाजपमध्ये जोरदार नाराजी होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या काही आक्रमक कार्यकर्त्यांनी आंदोलन करत उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेधही केला होता. दरम्यान, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना समज देत पुन्हा एकदा प्रत्युत्तर केले.

व्हिडिओ

नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ट्विटरच्या माध्यमातून म्हटले होते की, ''उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही''. दरम्यान, नितीन गडकरी यांनाही अशा प्रकारच्या आरोपांमधून जावे लागले होते. त्यामुळे कलंक म्हणजे काय हे त्यांनाही माहिती असणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.