Shiv Sena (UBT) And MNS Alliance: सेना मनसे एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत; उद्धव ठाकरे आपल्या शैलीतच बोलले
उद्धव ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत शिवसेना (UBT) आणि मनसे संभाव्य युतीबाबत भाष्य केले आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या दोन्ही बंधूंचे राजकीय मनोमिलन होणार का? हा प्रश्न पाठिमागील अनेक वर्षांपासून उभ्या महाराष्ट्रातील पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात सकारात्मक मिळेल असे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहे. दस्तुरखूद्द शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच असे स्पष्ट संकेत आज (6 जून 2025) मुंबई येते पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिले. प्रसारमाध्यमांनी दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीबाबत विचारले असता, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर बाकीच्या चर्चा सोडा, लवकर बातमीच देतो, असेही ते म्हणाले.
अद्याप अधिकृत घोषणा नाही
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या अद्यापही चर्चा आहेत. त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे राजकीय विश्लेषक आणि विविध राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते प्रतिक्रिया देताना अद्याप तरी सावध प्रतिक्रिया देत असले तरी, कार्यकर्त्यांना मात्र आवश्यक तो संदेश केल्याचे दिसते. दोन्ही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवरील पातळीवर एकमेकांशी जमवून घेण्यास सुरुवात केली आहे. याचे प्रत्यंत डोंबिवलीत झालेल्या काही कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळाले. विविध आंदोलने, मोर्चे किंवा कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे सेनेचे कार्यकर्ते परस्परांशी प्रेमाने वर्तन करत आहेत. सन्मानांची देवानघेवान करत आहेत. या पार्श्वभूमीवर युती होणे जवळपास निश्चित झाल्याचे समजले जात आहे. अर्थात त्याबाबत अधिकृत घोषणा नाही. (हेही वाचा, MNS-Shiv Sena (UBT) Alliance: शिवसेना (यूबीटी) आणि मनसे युतीबद्दल राज ठाकरे नेमके काय म्हणाले? त्याचे पडसाद मुंबईत काय उमटले)
कदाचित दोन्ही बंधूंचा संवादही झाला असेल..
शिवसेना (UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतेच म्हटले की, दोन्ही पक्षांच्या युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. आमचे नेते एका सुरात बोलत आहेत. हे झाड आहे. त्याला वाढू द्या. थोडा वेळ वाट पाहा. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना युतीची चर्चा करण्यासाठी प्रस्तावाची गरज नाही. दोघांचेही फोन क्रमांक एकमेकांकडे आहेत. त्यामुळे ते एकमेकांशी बोलून निर्णय घेतील. इतर कोणच त्याबाबत बोलू शकत नाही. कदाचित दोघांचे फोनही एकमेकांना झाले असतील, असेही राऊत म्हणाले.
जनतेच्या मनात आहे, उद्धव ठाकरे यांच्या मनात हवे
दोन्ही पक्षांनी एकत्र यावे हे महाराष्ट्राच्या अनेक वर्षांपासून मनात आहे. 2017 मध्येही ते जनतेच्या मनात होतेच. पण, तेव्हा ते बहुतेक उद्धव ठाकरे यांच्या मनात नव्हते. त्यामुळे आम्हाला त्याची सवय आहे. जनतेच्या मनात आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे का ते कळायला हवे, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

