Udayanraje Bhosale | (File Image)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने अनपेक्षीत निर्णय दिला. त्यामुळे मराठा समाजात सध्या अस्वस्थतेची भावना आहे. त्यात मराठा समाजाचे नेते आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. सातारा येथील भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही चिथावणीची भाषा वापरत प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात लोकप्रतिनिधींना घराबाहेर फिरु देऊ नका. त्यांना रस्त्यात आढवा आणि मराठा आरक्षणाचे काय झाले हे विचारा, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. निकालानंतर विनायक मेटे यांनीही मराठा समाज आक्रमकच राहिल असे म्हणत मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षण हा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. हा निकाल मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला असला तरी महाराष्ट्र सरकारने आरक्षणाबाबत आपली भूमिका स्वीकारली पाहिजे. राज्य सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. आतापर्यंत कोणत्याच पक्षातील नेत्याने आपली भूमिका जाहीरपणे मांडली नाही. त्यामुळे लोकप्रतीनिधींना रस्त्यावर फिरु देऊ नका. मग तो लोकप्रतिनीधी कोणत्याही पक्षाचा असेना. त्याला जाब विचारा. (हेही वाचा, उदयनराजे भोसले यांचे लॉकडाऊनच्या निषेधार्थ सातारा येथे ‘भीक मागो आंदोलन’)

दरम्यान, आक्रमक झालेला मराठा समाज आता लॉकडाऊन संपताच मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. प्राप्त माहितीनुसार येत्या 16 मे पासून महाराष्ट्रभर मोर्चा निघण्याची शक्यता आहे. बीड येथील मराठा समाजातील काही संघटनांमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत 16 मे पासूनच्या मोर्चा काढण्यावर चर्चा झाली, अशी माहिती शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी दिली आहे.

मराठा समाज आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच राजकीय पक्षांनी चिखलफेक सुरु केली आहे. भारतीय जनात पक्षाने महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तर महाविकासआघाडी सरकारने आरक्षणाचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला आहे.