नाशिक मध्ये अपहरणाच्या भीतीने 2 शाळकरी मुलींनी रिक्षामधून मारली उडी; एकीचा मृत्यू
autorickshaw | Pixabay.com

नाशिक (Nashik) मध्ये राज्याला सुन्न करणारी घटना घडली आहे. अपहरण होत असल्याच्या भीतीने दोन शाळकरी मुलींनी चालत्या रिक्षामधून उड्या मारल्या. यामध्ये एकीचा मृत्यू झाला आहे तर दुसरी गंभीर जखमी आहे. दरम्यान पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. हा प्रकार सिन्नर-ठाणगाव (Sinner-Thangao) या रस्त्यावर झाला आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, दोन विद्यार्थीनी महाराष्ट्र दिन साजरा करून आणि आपला निकाल घेऊन गावी परतताना रिक्षा मध्ये बसल्या. गाव आलं पण रिक्षा थांबत नसल्याने त्या घाबरल्या. आपलं अपहरण होतं आहे का? या भीतीने त्या चालत्या रिक्षामधून बाहेर पडल्या. यामधील एक इयत्ता 9वी मध्ये तर दुसरी इयत्ता 5वी मध्ये आहे.

आटकवडे गावाकडे जाण्यासाठी डुबेरे येथील बसथांब्यावर आल्या. तेथून रिक्षामध्ये बसल्या पण गाव आले तरीही रिक्षाचालक रिक्षा थांबवत नसल्याने त्या आरडाओरड करत होत्या. मात्र काहीच मदत मिळत नसल्याने घाबरल्या. त्यांनी एकापाठोपाठ उड्या मारल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. स्थानिकांनी सिन्नर रूग्णालयात त्यांना हलवले. मात्र उपचारादरम्यान 14 वर्षीय गायत्री चकणे चा मृत्यू झाला. सायली ही 11 वर्षीय विद्यार्थीनी उपचाराधीन असून तिची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान या घटनेत मृत्यूमुखी पडलेली गायत्री 9वीमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन यंदा दहावीत गेली होती. काही वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. सध्या ती तिच्या मामाकडे राहत होती.