अग्निशामक दलचे बचावकार्य (Photo Credit : ANI)

पुण्यातील (Pune) दापोडी (Dapodi) येथे ड्रेनेजसाठी (Drainage Line) खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन जणांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज संध्याकाळी दापोडी यथील आई उद्यानासमोर ही घटना घडली. जलनि:स्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात पडून ढिगाऱ्याखाली अडकून या दोघांचा मृत्यू झाला आहे. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार  महापालिकेच्या वतीने जलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे  काम सुरु आहे. यासाठी इथे जवळजवळ 20 फुट खोल खड्डे खणले गेले आहे. संध्याकाळीही जेसीबीने रस्ता उकराण्याचे काम सुरु होते. हा रस्ता उकरून शेजारीच ही माती टाकली जात होती.

एएनआय ट्वीट -

तर, यावेळी या मातीच्या ढिगाऱ्यावर काही कामगार उभे होते. अचानक ढिगारा कोसळला आणि यातील चार कामगार खड्ड्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी आजूबाजूचे लोक जमा झाले. परिस्थितीचे  गांभीर्य पाहता त्यांनी पोलीस प्रशासन व अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दल दाखल झाले व त्यांनी बचावकार्य सुरु केले. मात्र कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना अग्निशामक दलाचाही एक कर्मचारी खड्यात पडला. (हेही वाचा: पुणे: 200 फूट खोल बोअरवेलमध्ये 10 फुटांवर अडकला 6 वर्षांचा मुलगा)

अशाप्रकारे पुन्हा या पाच जणांना बाहेर काढायचे काम सुरु झाले. रात्री पावणे नऊच्या सुमाराम एनडीआरएफ आणि आर्मीचेही पथक मदतीसाठी दाखल झाले आहे. मात्र या पाचपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले असून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्यानेही बचाव कार्यात अडथळा येत होता. जखमींना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले आहे.