Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Pune: पुण्यातील कोथरूड परिसरात (Kothrud Area) गुरुवारी सकाळी घराच्या टेरेसवर टेलिव्हिजन केबल (Television Cable) फिक्स करत असताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही दोघे डीटीएच सेवेसाठी घराच्या टेरेसवर केबल टाकत होते. यावेळी हे दोघे हाय टेंशन वायरच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दुसरा अत्यंत गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील सुतारधारा परिसरात सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. पुंडलिक लक्ष्मण शिंदे (वय 33, रा. सुतारधारा) असे मृताचे नाव असून, स्वप्नील शिवराम बोडके (वय 28, रा. सुतारधारा) हा गंभीर भाजला आहे. (हेही वाचा - Sangli Accident: सांगली येथे विजापूर-गुहागर मार्गावर भीषण अपघात; पाच ठार, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश)

प्राथमिक माहितीनुसार, हे दोघे कामगार एका इमारतीच्या टेरेसवरून दुसऱ्या टेरेसवर डायरेक्ट-टू-होम टेलिव्हिजन सेट बसवत असताना केबल टाकत होते. हाय-टेन्शन पॉवर ट्रान्समिशन केबलमुळे त्यांना विजेचा धक्का बसला.

या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पुंडलिक लक्ष्मण शिंदे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत्यांच्या नातेवाईकांनी शोक व्यक्त केला आहे.