Maharashtra Assembly Session: महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन आज पासून; विधानसभा अध्यक्ष निवडणूक, बहुमत चाचणी पार पडणार
Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाराष्ट्रात मागील काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी झाल्या. त्यामधून सत्तांतर देखील झाले. पण आता राज्यात अस्तित्त्वात आलेल्या शिंदे-फडणवीस यांच्या सरकारची विधिमंडळात अग्निपरिक्षा होणार आहे. विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Two-Days Special Maharashtra Assembly Session) आजपासून बोलावण्यात आले आहे. यामध्ये आज (3 जुलै) विधानसभा अध्यक्षांची निवड होईल तर उद्या (4 जुलै) सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. शिंदे-फडणवीसांकडे बहुमताचा आकडा असला तरीही शिवसेनेत उभी फूट पडल्याने आता कोणाचा पक्षादेश खरा यावरून संघर्ष अटळ आहे.

आज विधिमंडळात महाविकास आघाडीकडून राजन साळवी विरूद्ध भाजपाचे राहुल नार्वेकर यांच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडणूकीची लढत आहे. तर 4 जुलैला नव्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे. शिवसेनेमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. बंडखोर आमदारांंचे नेत्तृत्त्व करणार्‍या शिंदे गटासमोर उद्धव ठाकरेंसोबत असणारे 16 आमदार असणार आहेत. या दोन्ही गटांनी आपले प्रतोद आणि गटनेते नेमले आहेत. त्यामुळे आता मूळ शिवसेना कोणती आणि त्यांच्यापैकी कोणाचा व्हिप लागू होणार यावरून मतभेद आहेत. Priyanka Chaturvedi On Maharashtra Politics: शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत, बंडखोरांना धडा शिकवणार; प्रियंका चतुर्वेदी यांचा विश्वास .

दरम्यान 21 जूनपासून शिवसेनेतून बंडाळी केलेले आमदार महाराष्ट्रातून सूरत तेथून गुवाहाटी आणि पुढे गोवा असा प्रवास करून 10-12 दिवसांनी काल रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना कटेकोट सुरक्षेमध्ये मुंबई विमानतळावरून दक्षिण मुंबईच्या ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये आणण्यात आले. येथेच त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आज सारे आमदार थेट हॉटेल मधून विधिमंडळात पोहचणार आहेत.

शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांविरूद्ध अपात्रतेची कारवाई केली आहे. त्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या बंडखोर आमदारांच्या गटाला 11 जुलै पर्यंत अपात्रतेच्या कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.