तुळजाभवानी देवी (फोटो सौजन्य-फेसबुक)

Tuljapur Tulja Bhavani Temple: राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे आतापर्यंत बंद ठेवण्यात आली होती. मात्र दिवाळीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्यापासून सर्व धर्मियांचे धार्मिक, प्रार्थना स्थळ आणि मंदिरे सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे मंदिरातील पूजाऱ्यांपासून ते भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे. याच पार्श्वभुमीवर तुळपुरची तुळजाभवानी मंदिर अखेर 8 महिन्यांनंतर भाविकांसाठी उघडले जाणार आहे. परंतु यावेळी कोरोनाच्या परिस्थितीचे भान ठेवत काही नियमांचे सुद्धा पालन करावे लागणार आहे.

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना प्रथम ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे. तर प्रतिदिनी फक्त 4 हजार जणानांच देवीचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याचसोबत प्रत्येक 2 तासांनी 500 भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येणार आहे. तुळजभवानी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर दर्शन घेण्यासाठी पैसे देऊन पास आणि फ्री पास सुद्धा उपलब्ध असणार आहेत. परंतु देवीच्या दर्शनावेळी भाविकांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश बंदी असणार आहे. तसेच भाविकांना ऑफलाईन पद्धतीने पास मंदिर परिसरातून काढता येणार आहेत.(Shirdi Sai Baba Temple to Reopen: सोमवारपासून शिर्डीचे साई बाबा मंदिर भक्तांसाठी खुले; फक्त 6 हजार भाविकांनाच परवानगी, ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे)

देवीचे मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे. तर कोरोनाच्या परिस्थितीचे भान ठेवून मंदिरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण वेळोवेळी केले जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे 65 वर्षावरील व्यक्तींसह लहान मुले, गर्भवती महिलांना दर्शनासाठी प्रवेश बंदी असणार आहे. प्रत्येक भाविकापासून एकमेकांपर्यंत 6 फूट अंतर ठेवून त्यांना देवीचे मुखदर्शन घेता येणार आहे. तुळजाभवानी मातेची पूजा सरकारने कोरोनासंदर्भात जाहीर केलेल्या नियम आणि अटींनुसार पार पाडली जाणार आहे. पण दुग्धाभिषेक, सिंहासन पूजेसह अन्य पूजांना परवानगी नसणार आहे. दरम्यान, देवीचे मंदिर आता उद्यापासून सुरु होणार असल्याने सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.