आज महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेत राज्यातील मंदिरे (Temple), प्रार्थना स्थळे उघडण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे सरकारचे जणू काही दिवाळी गिफ्टच आहे. गेले 7 महिने राज्यातील मंदिरे बंद होती व ती पुन्हा उघडण्यासाठी नागरिकांची मागणी वाढत होती. आता येत्या 16 नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरे दर्शनासाठी उघडतील. शिर्डीच्या (Shirdi) साईबाबा (Sai Baba) मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. आता राज्य सरकारच्या आजच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा साईबाबांची नगरी साईनामाच्या गजराने दुमदुमणार आहे. मात्र साईबाबा संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन बुकींग असलेल्या भाविकांनाच दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात लॉक डाऊन सुरु होते. गेल्या 7 महिन्यांमध्ये यामध्ये वेळोवेळी शिथिलता आणत राज्यात अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या, मात्र मंदिरांच्या बाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नव्हता. आता आज हा निर्णय घेत येत्या सोमवारपासून राज्यातील मंदिरे सुरु होणार आहेत. या बातमीमुळे साजहिकच भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र अजूनही कोरोनाचे सावट असल्याने शिर्डीमध्ये दिवसाला फक्त 6 हजार भाविकांनाच दर्शन मिळणार आहे व यासाठी ऑनलाइन बुकिंग करणे गरजेचे आहे.
साई मंदिरात दर्शन घेताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यावेळी मास्क बंधनकारक असतील व सामाजिक अंतर पाळले जाईल. 65 वर्षांच्यावरील लोकांना दर्शनाची अनुमती नसेल. लोकमतच्या वृत्तानुसार, भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदीरात जावुन दर्शन घेता येईल, मात्र चावडी आणि मारूती मंदीरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. भाविकांना मंदीरात हार, प्रसाद आदी पुजा साहित्य घेऊन जाण्याची परवानगी नसेल. मंदिरामध्ये सत्यनारायण, अभिषेक पुजा, ध्यानमंदीर, पारायण कक्ष बंद असतील. प्रसादालय व भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील भाविकांसाठी खूषखबर! 16 नोव्हेंबरपासून मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं खुली करण्यास राज्य सरकारची परवानगी)
पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र प्रार्थनास्थळ खुली केल्यानंतर भाविकांना काही नियमावली पाळणे गरजेचे असणार आहे.