प्रत्येक ठिकाणी कामाची शिस्त, नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे, कायद्याची कडक अंमलबजावणी करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचे नाव घेतले जाते. नुकतेच मुंढे यांची नागपूर महापालिकेमध्ये बदली करण्यात आली आहे. कामावर रुजू झाल्यावर तुकाराम मुंढे हे आपल्या कामाच्या बाबतीत किती चोख आहेत याचा प्रत्यय तिथल्या कर्मचाऱ्यांना आला.
मुंढे यांनी रुजू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात अनियमितता दाखवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी 28 जानेवारी रोजी कार्यभार स्वीकारला. सकाळली बरोबर 9.30च्या ठोक्याला ते कार्यालयात हजर होते. मुंढेंनी नागपूर महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची सुमारे 50 मिनिटे मीटिंग घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल सहा बैठका घेत कामांचा आढावा घेतला. यावेळी, लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांमध्ये कामाची अनियमितता आढळल्याने त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली. सोबतच मिटिंगसाठी उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आणि मोबाईल वाजायला नको, अशी तंबीही दिली.
(हेही वाचा: ठाकरे सरकारने केल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती)
तुकाराम मुंढे रुजू होण्यापूर्वीच त्याची धास्ती कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मुंढे येण्याआधी सर्व महापालिका स्वच्छ करण्यात आली. तसेच कर्मचारी वेळेत येण्यास सुरुवात झाली. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, त्याठिकाणी भाजपला शह देण्यासाठीच मुंढे यांच्या बदलीची ही खेळी खेळली असावी अशी शंका आहे. याआधी मुंढे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, परिवहन विभागाचे प्रमुख अशा अनेक उच्च पदांचा कार्यभार सांभाळला आहे.