गेल्या 13 वर्षांत 12 वेळा बदल्या झालेले वादग्रस्त अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आता तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी (Municipal Commissioner of Nagpur) बदली करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने आज राज्यातील 16 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये मुंढे यांची बदली नागपूर येथे झाल्याने त्याबद्दल चर्चा सुरु आहे.
नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, त्याठिकाणी भाजपला शह देण्यासाठीच ही खेळी खेळली असावी अशी शंका आहे. या सोबतच शेखर गायकवाड यांची पुणे महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच मेट्रो 3 च्या प्रकल्पावरुन अश्विनी भिडे यांचीही बदली करण्यात आली आहे
अश्विनी भिडे यांना अजूनतरी कोणतीही पोस्ट देण्यात आली नाही. आता त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंग देओल हे काम पाहणार आहेत. तुकाराम मुंढे यांची नाशिकवरून बदली झाल्याचे प्रकरण चांगलेच गाजले. मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेत स्थानीक कार्यकर्त्यांनी मुंढे यांच्या बदलीचा जोर धरला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नाशिकवरून थेट मंत्रालयात त्यांची बदली केली.
मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिवपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र परत एकदा त्यांची बदली त्यांना एड्स नियंत्रण मंडळावर पाठवले. आता ठाकरे सरकारने त्यांची बदली करत त्यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. या ठिकाणी या पदावर अभिजित बांगर काम करत होते. (हेही वाचा: वादग्रस्त अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली)
याआधी मुंढे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, परिवहन विभागाचे प्रमुख अशा अनेक उच्च पदांचा कार्यभार सांभाळला आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी कामाची शिस्त, नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे, कायद्याची कडक अंमलबजावणी असे त्यांचे व्यक्तिमत्व राहिल्याने अनेक राजकारणे आणि स्थानिक नेते, कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते. आता नागपूर येथे ते भाजपसाठी कोणत्या नव्या अडचणी निर्माण करतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.