एसटी बंद पडल्यास अरीरिक्त शुल्क न भरता इतर कोणत्याही बस मधून करा प्रवास; दिवाकर रावते यांची घोषणा
दिवाकर रावते (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र राज्यात वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या बसेसचा (MSRTC Bus) वापर सर्वात जास्त केला जातो. अगदी तळागाळातील लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत वेळ आल्यावर एसटीने प्रवास करतात. या प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे बस मधेच बंद पडणे. मुख्यत्वे लांबच्या पल्ल्याला अशा प्रकारे बस बंद पडल्याचा प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागतो. याबाबतच एक महत्वाचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. आता अशा प्रकारे बस बंद पडल्यास तुम्ही इतर कोणत्याही बसमधून आपला पुढील प्रवास करू शकणार आहात.

परिवहन मंत्री (Transport Minister) व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी आज या नव्या नियमाची घोषणा केली. पूर्वी हा नियम लागू होता मात्र जर का तुमची साधी एसटी बंद पडली असल्यास, तुम्हाला फक्त इतर सध्या एसटीमधूनच प्रवास करण्याची मुभा होती. मात्र आता तुम्ही इतर कोणत्याही उच्च श्रेणीच्या बस मधून प्रवास करू शकणार आहात. यासाठी कोणतेही ज्यादा शुल्क आकारले जाणार नाही. महत्वाचे म्हणजे पास धारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. लवकरच याबाबतचे परिपत्रक सर्व आगारांमध्ये पाठवले जाणार आहे.

पूर्वी अपघात किंवा इतर कोणत्याही कारणास्तव बस बंद पडली असल्यास प्रवाशांना फक्त त्याच श्रेणीमधील इतर बसमधून प्रवास करण्याची मुभा होती. मात्र अनेक मार्गांवर पुरेशा बसेस नसल्याने त्याच श्रेणीच्या बसची वाट पाहण्यात प्रवाशांचा वेळ वाया जायचा. याबाबत अनेक प्रवाशांनी महामंडळाकडे तक्रार केली होती. त्यावर विचार करून आता बस बंद पडल्यास इतर कोणत्याही श्रेणीच्या बस मधून ज्यादा शुल्क न भारत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.