
वाहतूकिच्या नियमाचा भंग करणाऱ्या वाहनचालकाला कायदेशीर समज देण्यासाठी धडपडणाऱ्या पोलिसावर जिवघेणा प्रसंग गुदरला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील असल्याचे समजते. या व्हिडिओत एका वाहनचालकाने थेट वाहतूक पोलिसालाच भरधाव स्वीफ्ट गाडीची धडक देऊन पोबारा केल्याचे दिसते. कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठीच गाडीचालकाने ये कृत्य केल्याची चर्चा आहे.
प्राप्त माहितीनुसार ही घटना ठाण्यातील गायमुख परिसरात रविवारी (१४ ऑक्टोबर) घडली. ठाणे वाहतूक पोलीस कर्तव्यावर होते. हे पोलीस वाहन चालवताना वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत होते. तसेच, रस्तेवाहतूक सुरळीत कशी राहील यासाठीही प्रयत्नशील होते. दरम्यान, एक स्विफ्ट कारचालक वाहतूक नियमाचा भंग करत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या ध्यानात आले. वाहतुक पोलीसाने या चालकास गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र, त्याने या वाहतूक पोलीसालाच धडक देत घटनास्थळावरुन पोबारा केला. (हेही वाचा, घरी कुणीतरी आतुरतेने वाट पाहते ना! मग, गाडी चालवताना या गोष्टींचे भान ठेवा)
या घटनेत पोलीस कर्मचारी महादेव हजारे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, पसार झालेल्या 'त्या' कारचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.