कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सर्वच सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचे नियम (COVID-19 Rules) अधिकाधिक कडक करण्यात आले आहेत. दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये (Tadoba Tiger Sanctuary) जाणा-या पर्यटकांसाठी देखील कोरोनाची नवी नियमावली बनविण्यात आली आहे. ताडोबामध्ये विनामास्क येणा-या पर्यटकांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्याचबरोबर कोरोनासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन करणे देखील बंधनकारक राहणार आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाणा-या पर्यटकांसाठी कडक नियमावली बनवली आहे. येथे येणा-या पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी जिप्सीच्या वेळा विभागून देण्यात येणार आहे.हेदेखील वाचा- ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजिवांची आवड असणाऱ्यांना इंटर्नशीप करण्याची संधी; 25 फेब्रुवारी पर्यंत करता येणार अर्ज
पाहा ताडोबातील महत्त्वाचे नियम:
- ताडोबात जाण्यासाठी ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असून, अर्धा तास आधी परतावे लागणार आहे.
- ज्या सफारी वाहनात सहा पर्यटक असतील, अशा वाहनांना ठराविक वेळेच्या अर्धा तास आधीही ताडोबात पर्यटनासाठी प्रवेश करता येणार आहे.
- विना मास्क कुणालाही प्रवेश दिला जाणार नसून, सर्व पर्यटकांचे थर्मल स्कॅनिंग प्रवेशद्वारावरच करण्यात येईल.
- सफारीचे जिप्सी वाहन निर्जंतूक करणे बंधनकारक राहील. सफारी दरम्यानही एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी करणार्या जिप्सीचालक तसेच पर्यटकांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन 1 ऑक्टोबर 2020 पासून नियमानुसार सुरू करण्यात आले होते. कोवीड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हे पर्यटन सुरू करताना केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक प्रशासन तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सुचविल्यानुसार खबरदारी घेवून निसर्ग पर्यटन राबविण्यात येत आहे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे वनकर्मचारी, मार्गदर्शक व जिप्सी चालकांना करोनाची लागण होवू नये याकरिताही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने वन्यजीव संरक्षण व वनसंपदा संवर्धनासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यात इंटर्नशीपचादेखील समावेश आहे. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता व्यवस्थापनाने मार्च ते जून 2021 या कालावधीत वन्यजीवप्रेमींसाठी इंटर्नशिप करण्याची संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.